नाशिक: राज्याच्या गृह विभागाने पोलीस अधीक्षक दर्जाच्या भापोसे व रापोसे अधिकाऱ्यांची बदली व पदस्थापनेबाबतचे आदेश गुरुवारी (दि.२०) काढले. नाशिक ग्रामिणचे पोलीस अधिक्षक सचिन अशोक पाटील यांची बदली करण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांचीही पदोन्नतीने धुळे अधीक्षकपदी पदस्थापना करण्यात आली आहे.
भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवेतील अधीक्षक दर्जाच्या २४ अधिकाऱ्यांच्या शासनाने बदल्या केल्या आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांची पदोन्नतीने नव्याने पदस्थापनाही करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीणचे अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदलीबाबत चर्चा सुरू होती. गेल्या वर्षी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच शासनाकडून पाटील यांची बदली करण्यात आली होती. यामुळे पाटील यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (कॅट) धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण काही दिवसांपुर्वीच पुर्ण झाली आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या गृह विभागाकडून औरंगाबादच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलीस अधीक्षकपदी नव्याने पदस्थापना करण्यात आली आहे; मात्र त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या अधीक्षकपदावर अद्याप कोणाचीही नियुक्ती शासनाने केलेली नाही.
महाराष्ट्र पोलीस अकादमीमधील अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची सोलापूर ग्रामिणच्या अधीक्षकपदी तर गौरव सिंह यांची यवतमाळच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. बदली आदेशात अन्य १९ पोलीस अधिकाऱ्यांचीही बदली केल्याचे दर्शविण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या बदलीनुसार नव्याने पदस्थापनेचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाही, ते स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.