गंगापूर : नाशिक तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी ८४ टक्के मतदान झाले. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. चांदशी ग्रामपंचायतीत सर्वात जास्त ८८ टक्के, राहुरी ८७, दरी ८५ टक्के, तर पिंपळद (ना.) ८० टक्के असे मतदान झाले.पहिल्यांदाच होत असलेल्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये व अर्ज भरलेल्या उमेदवारांमध्ये उत्सुकता दिसून आली. नाशिक तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह सदस्यांच्या निवडणुकीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत होती. नाशिक तालुक्यातील राहुरी, पिंपळद, दरी आणि चांदशी या चार ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह २८ सदस्यपदाच्या निवडणुकीच्या मतदानाला सकाळी साडेसात वाजता प्रारंभ झाला. ४ सरपंच व २४ सदस्यांसाठी ४ ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले.दरम्यान, पिंपळद (ना.) आणि राहुरी येथून आठ सदस्य बिनविरोध निवडून आले असल्याने या ठिकाणी नऊ आणि दोन जागांसाठी निवडणूक लढविण्यात आली. नऊ मतदान केंद्रांवर होत असलेल्या चार गावांतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चार निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात होऊन सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सरासरी ४५ टक्के मतदान झाले होते. दुपारी दीड वाजता मतदानाची टक्केवारी ६० टक्क्यांच्या आसपास पोहचली होती.जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करताना दिसून येत होते. सकाळपासून सुरू असलेले मतदान साडेपाच वाजेपर्यंत तालुक्यात शांततेत मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ८४ टक्के मतदान झाले. पाच हजार ३५२ नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
नाशिक तालुक्यात ८४ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:25 AM