संजय पाठक, नाशिक- दोन दिवस दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज जोर कमी झाला आहे त्यामुळे गंगापूरसह अन्य धरणांमधील विसर्गही कमी करण्यात आला आहे. अर्थात काल मुसळधार पाऊस झाल्याने काही शाळांना सुटी देण्यात आली आहे.
काल सकाळपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले हेाते. तसेच गंगापूर धरण ९५ टक्के भरल्याने विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे गोदावरी नदीकाठी पुरसदृष्य स्थिती होती. आज पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. काल रात्री ९ हजार ८८ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला हाेता. आज सकाळी ६ वाजता तो कमी करून आता ५ हजार ४३२ करण्यात आला आला आहे. तर नांदूर मध्यमेश्वर येथूनही विसर्ग कमी करून तो २१ हजार ४२४ क्युसेक करण्यात आला आहे. दारणा धरणातून होणारा विसर्ग मात्र वाढवण्यात आला असून सध्या १८६८ क्युसेक करण्यात आला आहे.