- शरदचंद्र खैरनारनाशिक - उन्हाचा तडाखा वाढल्याने राज्यात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातच काही ठिकाणचे संच देखभाल दुरुस्ती व ट्यूब लिकेजमुळे बंद आहेत. महावितरणची वाढती विजेची मागणी लक्षात घेता मुख्यालयाच्या सूचनेनुसार नाशिकच्या एकलहरे येथील तिसरा संचही सुरू करण्यात आला आहे.
सध्या येथे प्रत्येकी २१० मेगावॅटचे तीन संच आहेत. त्यापैकी एका संचाचा कोळसा खासगी कंपनीला वळविण्यात आला होता. येथील संचांची क्षमता ६३० मेगावॅट आहे. मात्र, आता मुख्यालयाकडून ४२० मेगावॅटचे लक्ष्य साध्य करण्याच्या सूचना असल्याने एकलहरेचा तिसरा संच ३१ ऑगस्टला कार्यान्वित करण्यात आला. तिसरा संच सुरू झाल्याने येथील वीज उत्पादन दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता लक्ष्याकडे वाटचाल करत ३८६ मेगावॅटपर्यंत पोहोचले आहे. येथे मुख्य अभियंता पदाचा कार्यभार सकारात्मक विचारसरणीचे प्रफुल्ल भदाणे यांनी १ सप्टेंबर रोजी स्वीकारल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रफुल्लता संचारली आहे. भदाणे यांच्या सर्वांना विश्वासात व सोबत घेऊन कार्य करण्याच्या कौशल्यामुळे एकलहरे वीज केंद्र आपले ठरवून दिलेले टार्गेट पूर्ण करेल, असे एका कामगार संघटना प्रतिनिधीने सांगितले.
एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्राबाबत नेहमीच उदासीनता बाळगण्यात आली आहे. मात्र, ज्या-ज्या वेळी राज्यावर विजेचे संकट येते, त्यावेळी एकलहरे केंद्राचीच मदत होते. त्यामुळे येथील ६६० मेगावॅट प्रकल्प होणे किती गरजेचे आहे, याची प्रचिती येते.
पावसाची ओढ अन् उन्हाचा तडाखासध्या राज्यात पावसाने ओढ दिल्याने उन्हाचा तडाखा वाढला आहे. विजेची मागणी वाढली आहे. विजेच्या मागणीत झालेली वाढ लक्षात घेता राज्याची विजेची मागणी अठ्ठावीस हजार मेगावॅटच्या जवळ पोहोचली आहे. राज्यात आजही आणीबाणीची वेळ आली तर ग्रिड स्टॅबिलिटीसाठी एकलहरे वीज निर्मिती केंद्राचे महत्त्व अधोरेखित होते.
एकलहरे येथील तीनही संच पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. कोळशाची उपलब्धता आहे. सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी वर्ग, ठेकेदार यांचे सहकार्य मिळत असल्याने विजेची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी व ठरवून दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.-प्रफुल्ल भदाणे(मुख्य अभियंता, एकलहरे वीज केंद्र)