नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण मोहीम सुरू होत असतानाच आता या विभागाने शहरातील ३४८ ब्लॅक स्पॉट प्रकरणी सहा विभागीय अधिकाऱ्यांना तिसऱ्यांदा स्मरणपत्रे पाठविण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मिर्ची हॉटेल ८ ऑक्टोबर २०२२ रोजी खासगी बसचा अपघात होऊन तेरा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शहरातील ब्लॅक स्पॉट हटविण्याचे आदेश दिले असता पालिकेने इंडिया रेझिलियंट संस्थेकडून सर्वेक्षण करुन घेतले. या संस्थेच्या पाहणीत एकूण ३४८ धोकादायक ब्लॅक स्पॉट आढळून आले.
या ब्लॅक स्पॉट प्रकरणी अहवाल देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. ब्लॅक स्पॉट प्रकरणी कारवाई वरुन अतिक्रमण व नगररचना विभागात कित्येक महिने टोलवाटोलवी सुरु होती. याप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी लक्ष घालत ब्लॅक स्पॉट हटविण्याच्या सक्त सूचना नगररचना विभागाला देत अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्याने पुन्हा अतिक्रमण विभागानेच संबंधित सिडको, सातपूर, नाशिक रोड, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, पंचवटी येथील सहाही विभाग प्रमुखांना दोनदा स्मरणपत्रे पाठविली होती. त्यातही कोणतीही मदत न झाल्याने आता तिसऱ्यांदा त्यांना स्मरणपत्रे पाठविण्यात येणार आहे.