नाशिक- राज्यात सत्ता समिकरणात झालेल्या भुकंपात नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादीचे तीन आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे ते राष्टÑवादी सोबत की अजित पवार यांच्या सोबत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी आज सकाळी राजभवनावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात जो राजकिय भुकंप घडून आला आहे. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटणे स्वाभाविक ठरले आहे. विशेषत: राष्टÑवादीच्या तिकीटावर निवडून आलेले कोणते आमदार शरद पवार यांच्या सोबत व कोण अजित पवार यांच्या सोबत याची चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदा राष्टÑवादीचा आकडा वाढला असून सहा आमदार निवडून आले आहेत. गेल्यावेळी २०१४ मध्ये या पक्षाचे चार आमदार होते. यंदा ज्या दोन नवीन जागांवर राष्टÑवादीला विजय मिळाला त्या निफाड व सिन्नर या दोन्ही ठिकाणचे आमदार अजित पवार यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी राजभवनावर झालेल्या शपथविधी समारंभास आमदार दिलीप बनकर व माणिकराव कोकाटे उपस्थित असल्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर फिरू लागल्याने हे दोन्ही अजित पवार यांच्या सोबत असल्याचे उघड झाले आहे. तसेही पक्षांतर्गत पातळीवर बनकर हे कायमच अजित दादांच्या जवळचे मानले जातात. तर कोकाटे हे शिवसेना, भाजप अशा पक्षांमध्ये जाऊन नंतर राष्टÑवादीत आलेले असून त्यांची महत्वाकांक्षाही लपून राहीलेली नाही. त्यामुळे कोकाटे यांचे देखील अजित पवार यांच्या सोबत असण्याचे जिल्हावासियांना आश्चर्य वाटलेले नाही. बनकर व कोकाटे या दोघांपैकी एकाला मंत्रीपद निश्चित असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. दरम्यान, दिंडोरीतून आमदारकीची हॅट्रीक केलेले नरहरी झिरवाळ हे देखील सकाळपासून नॉट रिचेबल असल्याने त्यांच्याबाबतही संभ्रम बळावला आहे.
जिल्ह्यातील राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ मुंबईत असून शरद पवार यांच्या सोबतच आहेत. तर कळवणचे आमदार नितीन पवार हे राष्टÑवादीच्या बैठकीसाठी मुंबईकडे निघाले आहेत. देवळाली मतदार संघातून शिवसेनेच्या योगेश घोलप यांचा पराभव करून प्रथमच निवडून आलेल्या सरोज आहिरे या देखील संपर्कात नसून त्या पक्षात नेमक्या कोणासोबत असतील याबद्दल खात्रीने सांगता येणारे नसले तरी सत्तेच्या अनुषंगाने त्या अजितदादांबरोबर जाण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.