नाशिक - महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा परंपरेनुसार शिवसेनेला म्हणजेच ठाकरे गटाला देण्यात येणार आहे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाला धुळे लोकसभा मतदारसंघ देण्यात येणार आहे.
शिवसेनेचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी याला दुजारा दिला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी आणि भाजप प्रमाणेच माकपचाही प्रभाव आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये सामील होऊन माकपला अपेक्षा नुसार ही जागा मिळालेली नाही.
माकपाच्या राज्यसचिव मंडळाचे सदस्य सुनील मालुसरे यांनी या संदर्भात दिंडोरी लोकसभा मतदार संघ मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येईल परंतु दिंडोरीची जागा मिळाली नाही तरी अडचण नाही. माकप महाविकास आघाडीबरोबरच राहील असे सांगितले. केंद्रातील भाजपा सरकारला पराभूत करणं हे महाविकास आघाडीचे प्रमुख उद्दिष्ट आहे त्यामुळे त्यानुसार तडजोड करावी लागल्यास हरकत नाही. असे त्यांनी सांगितले.