- दिनेश पाठक नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारपासून (दि.८) कामकाज बंदचा इशारा विविध शेतकरी संघटनांनी दिला होता. मात्र बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत सुरू होते, अशी माहिती जिल्हा सहकार विभागातील अधिकारी भिमा दाैंड यांनी दिली. कांदा निर्यातबंदीच्या विराेधात राज्यातील शेतकरी संघटनांकडून असहकार आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आंदोलनास सहकार्य करण्याचे पत्र संघटनांनी सभापतींना दिले हाेते. ७० टक्के व्यापाऱ्यांनी बंदसाठी नकारात्मक भूमिका दर्शविली.
एक महिन्यापूर्वी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केली होती. त्यातच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे कामकाजावर परिणामाची शक्यता वर्तविण्यात आली होती. रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार व छावा यासारख्या संघटनांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करत असहकार आंदाेलनाची हाक दिली होती. मात्र स्थानिक व्यापाऱ्यांनी आंदोलनास विरोध केला. सध्या मालाची आवकच कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. शेतकरी संघटनांनी दिलेल्या आंदोलनाचा जिल्ह्यातील बाजार समित्यांवर काय परिणाम झाला? याची माहिती घेतली असता बाजार समित्यांमध्ये सोमवारी कामकाज सुरळीत सुरू होते, अशी माहिती सहकार विभाग कार्यालयाकडून देण्यात आली.
२४ तास शेतमाल विकत घ्यावाआमची संघटना या आंदोलनात सहभागी नाही. शेतकऱ्यांचा माल २४ तास घेतला पाहीजे अशी रचना बाजार समित्यांच्या कामकाजाची हवी. २०१७ मध्ये जूनमध्ये आंदोलन झाले होते. समस्या येत राहतात त्यावर उपाय शोधले पाहीजे, मात्र सरकारने देखील शेतकऱ्यांचे हीत पाहून निर्णय घ्यायला हवे.- भरत दिघोळे, कांदा उत्पादक संघटनेचे उपाध्यक्ष