- अझहर शेख नाशिक - शहराच्या कमाल तापमानात वेगाने वाढ होत असताना पुन्हा लहरी निसर्गामुळे हवामानात दोन दिवसांत बदल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शुक्रवार व शनिवार (दि.८) नाशिक जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे ढग दाटून येण्याची शक्यता असून गडगडाटी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
एप्रिलच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात उष्ण लहरी अधिक प्रखर होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार उष्ण लहरी अधिकाधिक तीव्र होऊ लागल्यामुळे कमाल तापमानातही वाढ होत आहे; मात्र अचानक अवकाळीचे ढग दाटून येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे पुन्हा एकदा बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत.
शुक्रवार व शनिवारी जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. तसेच यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास इतका असण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
पुन्हा संकट दारावर...!अवकाळीचे संकट टळले असे वाटत असताना पुन्हा एकदा हे संकट उभे राहिले आहे. शहराच्या कमाल-किमान तापमानात वेगाने वाढ होऊ लागली. किमान तापमान सोमवारी १५ अंशांवरून थेट १७.५ अंशांपर्यंत तर कमाल तापमान ३० अंशांवरून मंगळवारी थेट ३५.४ अंशांवर पोहोचले. यामुळे आता पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार नाही, असे वाटत होते; परंतु लहरी निसर्गामुळे पुन्हा हवामानात बदल होणे अपेक्षित असल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे.