नाशिक : म्हसरूळ परिसरातील कलानगर तसेच अंबड औद्योगिक वसाहतीत घरफोडी करून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे़ चोरी गेलेल्या ऐवजामध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने तर कंपनीतील ऐवजामध्ये मशीनरीचा समावेश आहे़ याप्रकरणी म्हसरूळ व अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
घरफोडीची पहिली घटना कलानगरमधील गोकूळ धाम अपार्टमेंटमध्ये घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार कातकाडे (यमुना व्हिला, विडी कामगारनगर) यांची मेव्हणी गोकूळधाम अपार्टमेंटमध्ये राहते़ रविवारी फ्लॅटला कुलूप लावून कामासाठी त्या घराबाहेर पडल्या़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ यानंतर घराच्या बेडरूममधील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले प्रत्येकी तीन तोळे वजनाच्या दोन सोन्याची पोत, २० हजार रुपयांची रोकड असा एक लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडीची दुसरी घटना अंबड औद्योगिक वसाहतीतील क्लॅरिआॅन इंजिनिअर्स अॅण्ड टेक एलएलपी या कंपनीत शनिवारी (दि़९) घडली़ चोरट्यांनी कंपनीचे शटर उचकून सुमारे एक लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलीस ठाण्यात योगेश हिरे (रा़ उषाकिरण सोसायटी, त्र्यंबकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी क्लॅरिआॅन इंजिनिअर्स अॅण्ड टेक या कंपनीचे शटर उचकटून आत प्रवेश केला. यानंतर कंपनीतील वेल्डिंग मशीन, पाइप कटर मशीन, मिक्सर मशीन प्लेट, मशीनचा स्टेनलेस स्टीलचा लायनर नावाचा लॉक पार्ट, एअर गार्डर, बॉटम सायक्लॉन फ्लॅक व हॉपर पार्ट, सीएससी मशीन कटिंगचे ५० किलो वजनाचे पार्ट, टेबल फ्रेम, लायनर पाइप, स्क्रू गिअर बॉक्स, मशीन रॉड, गिअर बॉक्स, छोटे लोखंडी पाइप व मशीनिंग प्लेट, असा एक लाख सात हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़