- शाम धुमाळ कसारा - मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटाजवळ सोमवारी (20 ऑगस्ट) सकाळी भीषण अपघात झाला. लतिफवाडी गावाजवळ एका भरधाव टँकरने रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या कारला धडक देऊन पिक-अप बोलेरो गाडीवर आदळला. या भीषण आपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही महिला रस्त्याशेजारी उभ्या राहून चहा पित होत्या. या दोघींनाही धडक देऊन भरधाव टँकरनं त्यांना 50 फूट अंतरावर फरफटत नेले. हा अपघात इतका भीषण होता की,महिलांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले. दरम्यान, जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुंबईहून नाशिककडे निघालेल्या कारमधील (क्रमांक MH 02 EP 9119) मंडळी लतिफवाडीजवळ एका ढाब्यावर चहापाणी घेण्यासाठी थांबली असता भरधाव येणाऱ्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला व टँकरची कार व बोलेरो गाडीला धडक बसली.
मदतीसाठी धावले देवदूत दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन गृपचे सदस्य, पिक इन्फ्रा पेट्रोलिंगचे सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. या मदत कार्यामुळे तीन जणांवर वेळीचे उपचार करणे शक्य झाले. या घटनेची माहिती मिळताच कसारा पोलीस व महामार्गावरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंदण जाधव, पी.एस.आय डगळे पुढील तपास करत आहेत.
अपघाती क्षेत्राकडे ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष दरम्यान कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेला लतिफवाडी परिसर हा अपघाती क्षेत्र असून या ठिकाणी वर्षभरात आतापर्यंत आठ बळी गेले आहेत. तर 50हून अधिक जखमी झाले आहेत. या क्षेत्रात रस्त्यांवर पांढरे पट्टे तसेच स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी अनेकदा तक्रारी करुन देखील पिक इन्फ्राचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिरुद्ध सिंग तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.