नाशिक - शनिवारी रात्री व रविवारी दुपारी काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने तडाखा दिला. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसला असून, निफाड तालुक्यात गारपिटीने द्राक्षबागांसह ऊस, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. सातारा शहर व परिसरात दोन तास मुसळधार पाऊस झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये आंबा पिकाला फटका बसला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, धुळे या जिल्ह्यांतही पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील काही जिल्ह्यात साेमवारपासून पावसाची तीव्रता वाढणार असून गारपिटीचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
वीज पडून युवतीचा मृत्यू नंदुरबार जिल्ह्यातील जावदा तर्फ बोरद (ता. शहादा) येथे शेतात काम करताना सपना राजेंद्र ठाकरे (वय १८) या युवतीच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला. पश्चिम वऱ्हाडातील अकाेला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात आगामी दोन दिवस २७ व २८ नोव्हेंबरदरम्यान तुरळक किंवा काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.