नाशिक : शहर व परिसरात शुक्रवारी (दि.5) सकाळपासून शहरात ढगाळ हवामान अधूनमधून तयार होत होते. वातावरणात दमटपणा वाढून कमाल तापमानात वाढ झाली आणि अचानकपणे शहरात पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास जोरदार सरींचा वर्षाव झाला. यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.
लक्षद्वीपच्या दक्षिण व पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून हे क्षेत्र पुढील तीन दिवसांत वरच्या बाजूने सरकत अधिक दाट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाशिक जिल्ह्यात येत्या रविवारी (दि. ७) काही भागात बेमोसमी पाऊस होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. मात्र शुक्रवारी शहरासह त्र्यंबकेश्वर तालुक्याला पावसाने झोडपले. लक्षद्वीप-कर्नाटक सागरी किनारपट्टीत द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविला गेला आहे.
नाशिक शहरात शुक्रवारी(दि.5) संध्याकाळपर्यंत तापमानाचा पारा 31.1अंश सेल्सिअस इतका स्थानिक हवामान केंद्राकडून मोजला गेला. नाशकातील काही ठरावीक भागात रविवारीसुद्धा हलक्या सरींचा वर्षावाचा अंदाज कुलाबा वेध शाळेकडून वर्तविला गेला आहे.
अचानकपणे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला यामुळे उकाड्याने दिवसभर हैराण झालेल्या नाशिककरांना दिलासा मिळाला. बेमोसमी पावसाच्या हजेरीने परिसर जलमय झाला होता. शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही पावसाने सलामी दिली.