पंचवटी : मित्राला झालेल्या मारहाणीचा वाद मिटवायला गेलेल्या यश रामचंद्र गांगुर्डे या तरुणाला चौघा हल्लेखोरांनी शस्त्राने भोसकून ठार मारल्याच्या घटना दिंडोरी रोडवर बुधवारी (दि.१८ रात्री घडली. तसेच गुरुवारी (दि.१९) सकाळी पंचवटीतील सामाजिक कार्यकर्ते मनपा कर्मचारी जगदीश जाधव यांनी त्यांच्या राहत्या घरात बैठक खोलीत गळफास घेतला आणि सोफ्यावर त्यांचा तरूण मुलगा प्रणवदेखील मृतावस्थेत आढळून आला. या घटना सकाळी उघडकीस येताच शहर हादरले.
पत्ता सांगण्याच्या बहाण्यावरून मित्राला मारहाण केली म्हणून झालेला वाद मिटविण्याच्या प्रयत्न चौघांसोबत यश करत होता. म्हसरूळमध्ये मित्राला मारहाण केली. म्हणून काही वेळेतच यश हा उद्यानाजवळ पोहोचला. त्यांनी मारहाण करणाऱ्या चौघा युवकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्यापैकी एकाने शिवीगाळ सुरू केली आणि हातातील धारधार मोठ्या शस्त्राने यशच्या पोटावर सपासप वार केले. काही मिनिटांतच यश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. शस्त्राने घाव वर्मी लागल्याने यशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, जाधव पिता-पुत्रांच्या अचानकपणे झालेल्या मृत्यूनेही पंचवटीकरांना धक्का दिला. या दोन्ही घटना पंचवटी शिवारात घडल्याने परिसरात दिवसभर याविषयी चर्चा सुरू होती. जगदीश जाधव यांनी आत्महत्या का केली? त्यांचा मुलगा प्रणव याचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. याविषयी संभ्रमावस्था रात्री उशिरापर्यंत कायम होती. पोलीस अधिकाऱ्यांनीदेखील याबाबत स्पष्टपणे मत नोंदविले नाही. यामुळे अकस्मात मृत्यूची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.