-संजय पाठक नाशिक- नाशिक महापालिकेतील म्युनिसीपल कर्मचारी सेना ही मान्यता प्राप्त संघटना असून ती उध्दव सेनेतील कामगार सेनेशी संलग्न आहे.मात्र, नाशिकमधील संस्थापक माजी मंत्री बबनराव घोलप असून गेल्या वर्षी यासेनेच्या अध्यक्षपदी त्यांनी उध्दव सेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन निवड केली होती. त्यामुळे आता ही कर्मचारी सेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाली आहे.
नाशिक महापालिकेत साडे चार हजार अधिकारी कर्मचारी असून त्यातील सुमारे दोन ते अडीच हजार म्युनिसपल कर्मचारी कामगार सेनेचे सभासद आहेत. ही महापालिकेतील एकमेव मान्यताप्राप्त युनीयन आहे. गेल्या वर्षी या सेनेचे अध्यक्ष, माजी नगरसेवक प्रविण तिदमे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी युनीयन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र, बबनराव घोलप यांनी त्याला विरोध केला आणि वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन उध्दव सेनेचे तत्कालीन महानगर प्रमुख आणि सध्याचे जिल्हाप्रमुख सुधाकरबडगुजर यांची अध्यक्षपदी निवड केली होती. हा वाद प्रचंड गाजला आणि पोलीस ठाण्यात तक्रारी तसेच उच्च न्यायालयात पाेहोचला होता. विशेष म्हणजे प्रवीण तिदमे हे शिंदे सेनेचे महानगर प्रमुख असून ते घोलप यांचे शिष्य मानले जातात. आता बबनराव घोलपच शिंदेसेनेत आल्याने म्युनिसीपल कर्मचारी सेनेचे काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.