नाशिक - गणेशोत्सव तोंडावर आला असताना नाशिक शहरात वाद चिघळला असून मंडप धोरणानुसार एकूण रस्ते रूंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडप टाकण्यास परवानगी असल्याने उत्सवच धोक्यात आला आहे. यासंदर्भात गणेशोत्सव महामंडळाची तातडीची बैठक महापालिकेत होऊन आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.३) आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली मात्र त्यांनी नियम शिथील करण्यास नकार दिल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांत असंतोषाचा उद्रेक झाला असून येत्या दोन ते तीन दिवसात मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे आणि राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी सांगितले. विशेष म्हणजे बैठक सुरू असतानाच शेटे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना दुरध्वनी केला परंतु त्यांनीही याप्रकरणात हतबलता व्यक्त केली आहे.
उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार उत्सव काळातील मंडपांसाठी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार अर्ज करताना मंडपाचा नकाशा सादर करावा लागणार असून तो महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून तपासून त्याला मान्यता घेतल्यानंतरच परवानगी दिली जाणार आहे. त्यातच रस्त्यांच्या रूंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडपांना परवानगी दिली जाणार असून मोठ्या मंडळांना परवानगी मिळणेच अशक्य आहे. तर गावठाण भागात रस्ते मुळातच अरूंद आहेत. तेथे शिथीलता देण्यास आयुक्तांनी नकार दिल्याने गावठाण भागातील गणेशोत्सवच यंदा संपुष्टात येणार आहे.