नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बांधकाम विभागाकडून केल्या जात असलेल्या कामांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी चांदवड तालुक्यातील एका कामाच्या दर्जाची पाहणी केल असता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम आढळले. यामुळे त्यांनी त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत.
यापुढे जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचा दर्जा तपासणीसाठी केवळ गुणवत्ता नियंत्रण दाखल्याच्या भरवशावर न थांबता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वर्षानुवर्षे जिल्हा परिषदेकडून केल्या जाणाऱ्या सुमार दर्जाच्या कामांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी नुकत्याच झालेल्या रस्त्यांची दुरवस्था पहिल्याच पावसाळ्यात कायम असल्याची अनेक उदाहरणे घडत असल्याने नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत शाखा अभियंता व उपअभियंता यांच्याशी ठेकेदारांचे संगनमत असल्याचा आरोप केला जात असल्याचीही चर्चा आहे.