नाशिक : निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्ह्यात मतदार पडताळणी कार्यक्रम सुरू करण्यात आला असला तरी पडताळणी मोहिमेबाबत बीएलओंमध्ये निरुत्साह असल्याने निवडणूक शाखेने कारवाईचा इशारा देताच कामाला काही प्रमाणात गती प्राप्त झाली आहे. मात्र कळवण आणि निफाड तालुक्यामधील बीएलओंकडून अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने जिल्ह्यातील पहिली कारवाई यापैकी एका तालुक्यातून होऊ शकते, अशी शक्यता निवडणूक यंत्रणेकडून वर्तविली जात आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील मतदारांची पडताळणी करण्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आखून दिलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यात २० डिसेंबरपर्यंत सुमारे ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र बीएलओ गांभीर्याने काम करीत नसल्याने केवळ ८९ हजार मतदारांची पडताळणी करण्यात आल्याचे समोर आले होते. निर्धारित वेळेत उद्दिष्ट साध्य होणार नसल्याने त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. जे कर्मचारी गांभीर्याने कर्तव्य बजवणार नाहीत अशा बीएलओंवर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक विभागाने दिल्याने आता बीएलओ कामाला लागले आहेत. गुरुवार (दि.१६) पर्यंत १६ लाख ४ हजार २८८ मतदारांची पडताळणी पूर्ण करण्यात आलेली आहे.
कारवाईच्या बडग्यानंतर बीएलओ लागले कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 5:45 PM