संजय पाठक, नाशिक : गेल्या महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना संसर्गाबाबत नाशिक सुरक्षित वाटत होते आणि अचानक दुर्दैव सुरू झाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही बाधित रुग्ण आढळले आहेत. बघता बघता जिल्ह्यात ही संख्या पंधरावर पोहोचली आणि दोन जणांचे बळी गेले. मालेगावसारखा भाग ग्रामीणबरोबरच शहरातील आरोग्य सजग- सुशिक्षित भागातदेखील तीन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्या संपर्कात कोण आहेत, ते तपासून त्यांच्या जीव वाचविण्यासाठी तीन तीन किलोमीटर परीसर आरोग्य यंत्रणांना सील करावा लागत असेल तर बाहेरून कोणी येऊ नये यासाठी गावबंदी करणारे ग्रामस्थ परवडले! आताही कोरोनाबाबत स्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर आता ‘नाशिककर बस कर, संचारबंदीचे पालन कर’ म्हणण्याची वेळ आली आहे.
जगावर आलेले संकट बघता कोरोेनाची महामारी आपल्याकडे फिरकू नये यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले. परंतु त्याचे गांभीर्य आपल्याकडे आहे की नाही, असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती सध्या दिसते आहे. कोरोना टाळण्यासाठी संचारबंदी लागू झाली. म्हणजेच कोणीही रस्त्यावर फिरायचे नाही हा कायदा!
खरे तर दंगलीतील संचारबंदी आणि आरोग्यावरील आपत्तीमुळे आलेली संचारबंदी पूर्णत: वेगळी. त्यामुळे यंत्रणांची भूमिका बदलली. कायद्याचा धाक दाखविणे आणि दंडुक्याचा वापर करण्यापेक्षाही सामंजस्याने घेतलेले बरे, यामुळे संचारबंदीतही नित्याचे दैनंदिन जगणे सुखकर व्हावे यासाठी यंत्रणांनी खूप सुविधा दिल्या. किराणा आणि औषधांची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली. भाजीबाजाराची व्यवस्था निश्चित केल्या. घरपोच भाजीपाला देण्यासाठीही व्यवस्था केली. कोणाला भोजनाची भ्रांती पडली तरी खाद्य सेवा पुरवणाऱ्या काही कंपन्यांना सवलती दिल्या. त्यासाठी पार्सल सेवा सुरू ठेवली. औषधेदेखील घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली. बॅँकेत कोणीही जाऊ शकेल, असे सारे काही अत्यावश्यक म्हणून करता येईल त्याची सोय महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने केली. परंतु त्याचे तात्पर्य काय? अशा कामाच्या निमित्ताने म्हणा किंवा दुसरे निमित्त करून शहरात भटकंती करण्याचे मात्र थांबत नाही.
अत्यावश्यक कामासाठी कोणी जात असेल तर त्यालाही अटकाव नाही. परंतु ही सारी सोय म्हणजे जणू शहरात संचारबंदीच नाही असे समजून हुंदडणाऱ्यांना काय म्हणणार? शहरात गर्दी वाढू लागली. कारण नसताना हिंडणारे, बंद शहराचे व्हिडीओ काढणारे, बंदीमुळे घरात बसून कंटाळलो म्हणून पाय मोकळे करण्यासाठी बाहेर येणारे सर्वच रस्त्यावर येऊ लागले. जॉगिंगसाठी बाहेर येणारे आरोग्य संवर्धनासाठी शहरात येतात की जीव धोक्यात घालण्यासाठी एवढी साधी जाणीवही त्यांना नाही. काही महाभाग तर कुत्र्यांना फिरवण्याच्या निमित्ताने बाहेर पडतात. या सर्वांना पायबंद घालायचा पण कोणी? पोलिसांनी एक लाठी मारली की, त्यांच्या नावाने शिवीगाळ करणारे, प्रसंगी त्यांच्यावर धावून जाणारे आपण असे स्वैराचार का करतोय याचे साधे आत्मपरीक्षणदेखील करीत नाही.
कायद्याला आणि नियमांना आव्हान देण्याची एक प्रवृत्ती वाढत आहे. वाहतूक नियमांचे किंवा संचारबंदीचे अशा प्रकारच्या नियमांचे भंग केल्यास थ्रील अनुभवणारी मंडळी आहे. यंत्रणांना चकवून आपण कसे इप्सित साध्य केले हे अभिमानाने सांगणारी मंडळी आहेत. नियमांची चौकट मोडण्याचा वृथा अभिमान नष्ट होत नसेल तर शासकीय यंत्रणांनी इतकी शिथिलता द्यावी काय? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. तथापि, यंत्रणांना अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर केवळ सोशल मीडियावर स्टे होमचे स्टेट््स टाकून बाहेर फिरण्याची हौस टाळणेच आवश्यक आहे. स्वच्छ, सुंदर, विकासयुक्त नाशिकबरोबर आज निरोगी नाशिक, कोरोनामुक्त नाशिक अशी घोषणा देण्याची वेळ आली आहे.