नाशिक : गेल्या चार दिवसांत शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, अचानकपणे शहराच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागल्याने उकाडा जाणवू लागला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने शहराचे कमाल तापमान रविवारी (दि.२२) थेट ३१.२ अंशांपर्यंत पोहचले.गुरुवारी (दि.१९) शहरात दुपारी पावसाच्या सरींचा वर्षाव झाला होता; मात्र त्यानंतर पुन्हा शहराचे वातावरण बदलले. शुक्रवारपासून शहरात ऊन तापायला सुरुवात झाली. गुरुवारी शहराचे कमाल तापमान ३०.१ अंश इतके नोंदविले गेले होते. शुक्रवारी एक अंशाने तापमानात घट झाली, मात्र शनिवारपासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागली असून, रविवारी पारा थेट ३१.२ अंशांपर्यंत पोहचला. त्यामुळे नागरिकांना रविवारी उन्हाची अधिकच तीव्रता जाणवली. सध्या भाद्रपद हा मराठी महिना सुरू असल्याने ऊन वाढण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. भाद्रपदचे ऊन मे महिन्यापेक्षाही अधिक प्रखर असल्याचे बोलले जाते. मराठी कालगणनेतील हा सहावा महिना मोजला जातो. रविवारी सकाळपासूनच शहरात प्रखर ऊन पडले होते. यामुळे वातावरणात सायंकाळपर्यंत कमालीचा उष्मा निर्माण झाला होता. नागरिकांना दिवसभर त्याचा त्रास सहन करावा लागला. पारा ३१ अंशांपार सरकला.सध्या कमाल तापमान वीस अंशांच्या जवळपास राहत होते. अचानक वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.