नाशिक : लष्करात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये घेतल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तीपत्रे देणा-या अहमदनगरमधील तिघा संशयितांना जळगाव जिल्ह्यातील भडगाव पाचोरा येथून जळगाव पोलिसांनी अटक केली आहे़ हसाउद्दीन चांदभाई शेख, त्याची पत्नी रेश्मा हसाउद्दीन शेख व मुलगा वजीर हसाउद्दीन शेख (तिघेही रा़ अहमदनगर) अशी या संशयितांची नावे आहेत़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
इंदिरानगर पोलीस ठाण्यात तुळशीदास भानुदास पटेल (५०, रा़ अभोणा, ता़ कळवण, जि़ नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांनी त्यांच्या मुलास लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून २०१४ मध्ये दादासाहेब फाळके स्मारकात २० लाख रुपये घेतले व लष्करातील नोकरीचे नियुक्तीपत्रही दिले़ पटेल यांचा मुलगा नियुक्तीपत्र घेऊन संबंधित ठिकाणी गेला असता हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे तसेच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ यानंतर पटेल हे संशयित शेखच्या घरी गेले व पैशांची मागणी केली; मात्र त्यांचे पैसे परत न देता शेख दांपत्य मुलासह फरार झाले़
दरम्यान, पटेल यांच्याप्रमाणेच कळवण तालुक्यातील अभोणा येथील आणखी दोन व नाशिकमधील एक अशी तिघांची संशयित शेख दांपत्याने सुमारे ६८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ या संशयितांना जळगाव पोलिसांनी अटक केली असून, या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांची नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवूणक केल्याचे पोलिसांनी सांगितले़