नाशिक : जिल्हा रुग्णालयातील परिचारिका महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आली. प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली आणि रिक्षामध्ये बसून पाथर्डीफाट्यावर गेली़ रिक्षातून उतरल्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे तर रिक्षातच विसरल्याचे लक्षात आल्यानंतर तिला रडूच कोसळले़ मात्र, प्रामाणिक रिक्षाचालकाने कागदपत्रांद्वारे या मुलीचा शोध घेऊन तिची कागदपत्रे परत केल्याने तिच्या चेह-यावर हसू फु लले़ या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव सुनील एकनाथ सोनवणे असे असून त्याच्या या प्रामाणिकपणाची दखल घेऊन मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे यांनी त्याचा सत्कार केला़
विंचूर येथील आकांक्षा विनोद जोशी ही विद्यार्थिनी आईसोबत जिल्हा रुग्णालयातील परिचारिका महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आली होती़ कागदोपत्री पूर्तता झाल्यानंतर ती पाथर्डी फाटा येथे जाण्यासाठी रिक्षा (एमएच १५, ईएच ०३७५) मध्ये बसली़ पाथर्डी फाटा येथे रिक्षातून उतरल्यानंतर काही वेळाने आपली शालेय कागदपत्राची बॅग रिक्षातच राहिल्याचे तिच्या लक्षात आले़ यानंतर तिने व तिच्या आईने रिक्षाचा शोध घेतला, परंतु तो सापडत नसल्याने आकांक्षाला रडून कोसळले़ यावेळी काहींनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्लाही दिला़ मात्र काही वेळातच रिक्षाचालक सुनील सोनवणे यांनी फोन करून तुम्ही कोठे आहात, अशी चौकशी करून मुंबई नाका पोलीस ठाण्यात बोलावून घेतले़
मुंबई नाका पोलीस ठाण्यात या दोघी मायलेकी आल्यानंतर रिक्षाचालक सोनवणे यांनी शालेय कागदपत्रे त्यांच्या ताब्यात दिली़ यावेळी शहरात प्रामाणिक रिक्षाचालक असल्याचा प्रत्यय आल्याची प्रतिक्रिया या दोघींनी व्यक्त केली़