नाशिक : रिक्षाप्रवासात महिलेच्या बॅगमधून चोरट्यांनी सव्वादोन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़ ४) सायंकाळच्या सुमारास घडली़ रिक्षा व बसप्रवासात दागिने व रोख रक्कम चोरी होण्याची ही तिसरी घटना असून, यामुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण परसले आहे़
पाथर्डी फाटा येथील रहिवासी रंजना कैलास सोनवणे (४७, रा़ चंद्रभागा रो-हाउस, मुरलीधरनगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास त्यांनी पाथर्डी फाटा ते शांतीनगर, मखमलाबाद या परिसरात रिक्षाने प्रवास केला़ या प्रवासादरम्यान रिक्षात बसलेल्या चोरट्यांनी त्यांच्याजवळील हॅण्डबॅगमधील पिशवीतून २ लाख २२ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरूले़
सोनवणे यांच्या चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये एक लाख ७५ हजार रुपयांचे सात तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २५ हजार रुपये किमतीचा एक तोळे वजनाचा गोफ, साडेसात हजार रुपये किमतीचे डोरले, नऊ हजार रुपयांचे कानातले, सोन्याची नथ, चांदीचे वाळे, पायातले जोडवे यांचा समावेश आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नाशिकरोड व मेळा स्थानकात चोरीच्या घटनामहाराष्ट्र दिनाच्या दिवशी मेळा बसस्थानकात कल्याण येथील गोकुळनगरमधील रहिवासी सुनीता हिले या कसारा बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील एक लाख दहा रुपये किमतीचे चार तोळ्याचे मंगळसूत्र एका महिलेने चोरून नेले़ तर नाशिकरोड ते द्वारकादरम्यान रिक्षाने प्रवास करणाऱ्या कल्याण येथील गुरुदेव सोसायटीतील रहिवासी शोभा बाळू नवाळे या महिलेच्या पर्समधील ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, २१ ग्रॅम सोन्याचा नेकलेस, अर्धा तोळ्याची अंगठी, कानातील झुबे व कानसाखळ्या असे एक लाख ८० हजार रुपयांचे दागिने रिक्षातील दोन संशयित महिलांनी चोरून नेल्याची घटना घडली़