नाशिक : मिळकतीचे बनावट साठेखत, खरेदीखत तसेच खोटा सर्च रिपोर्ट बँक आॅफ इंडियाच्या शिवाजी उद्यान शाखेत जमा करून त्याद्वारे ४४ लाख रुपयांचे कर्ज काढून सहा संशयितांनी बँकेची फसवूणक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या संशयितांमध्ये एका महिला वकिलाचाही समावेश असून, त्यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बँकेच्या शिवाजी उद्यान शाखेतील अधिकारी नवीन पारस भारती (रा. २, गुरुदेव प्लाझा, गोविंदनगर, नाशिक) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित धनंजय रोहिदास पगार, विजयश्री धनंजय पगार, कविता विश्वास थोरात, विश्वास वसंत थोरात, कविता शरद पगार व अॅड. इंद्रायणी सहानी या सहा संशयितांनी संगनमत करून २१ डिसेंबर २०१२ ते २३ जानेवारी २०१३ या कालावधीत बँक आॅफ इंडियामध्ये मिळकतीचे बनावट साठेखत, खरेदीखत तसेच सर्च रिपोर्ट सादर केला़
या बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रत्येकी २२ लाखांचे दोन कर्ज प्रकरणे बँकेकडे मंजुरीसाठी पाठविली होती़ संशयितांनी दिलेल्या कागदपत्रांनुसार बँकेने संशयितांना कर्ज खाते क्रमांक ०८०६७५११०००००६३ व अन्य एका खात्यावर प्रत्येकी २२ लाख रुपये कर्ज मंजूर केले़ त्यानुसार संशयितांनी बँकेतून ४४ लाख रुपयांचे कर्ज घेतले़
बँक प्रशासनाने कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर बनावट साठेखत, खरेदीत तसेच खोटा सर्च रिपोर्ट असल्याचे समोर आले़ त्यानंतर बँक प्रशासनाच्या वतीने भारती यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.