नाशिक : टूर अॅरेंज करून देण्याच्या नावाखाली भाजपा गटनेत्यासह त्यांच्या ओळखीतील नागरिकांकडून प्रत्येकी दीड लाख रुपये घेऊन ट्रॅव्हल व्यावसायिकाने पंधरा लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ भाजपा गटनेते संभाजी मोरूस्कर यांचा या फसवणूक झालेल्या नागरिकांमध्ये समावेश आहे़
संभाजी श्यामराव मोरूस्कर (६१, रा़ शाहूनगर, नाशिकरोड) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार १ मे २०१७ ते ८ मार्च २०१८ या कालावधीत दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचे संचालक संशयित प्रवीण खिवंसरा यांनी टूर अॅरेंज करून देतो असे सांगितले़ त्यानुसार संभाजी मोरूस्कर, सुरेश वराडे, कांता वराडे, सूर्यकांत शिंदे, शैलजा शिंदे, वसंत विसपुते, संगीता विसपुते, बाळासाहेब कडलग, राजश्री कडलग यांनी प्रत्येकी दीड लाख असे पंधरा लाख रुपये खिवंसरा यांना अॅडव्हान्स म्हणून दिले़ मात्र, संशयित खिवंसरा यांनी हे पैसे केसरी टुर्समध्ये न भरता तुमचे पैसे थॉमर्स अॅण्ड कुक ट्रॅव्हल्समध्ये भरतो असे सांगितले़ मात्र, प्रत्यक्षात पैसे न भरता तसेच टूर अॅरेंज न करून देता या रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़
या प्रकरणी मोरूस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़