नाशिक : द्वारका परिसरातील महिंद्रा रेनॉल्ट कंपनीच्या कारविक्री शोरूममधील अकाउंटण्टने कार विक्रीनंतर मिळालेल्या पैशांच्या हिशेबात गोंधळ करून शोरूमची तब्बल एक कोटी ४६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित जुनेद फय्याज पटेल (२५, रा. संगमनेर चाळ, देवळालीगाव, नाशिकरोड) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
भद्रकाली पोलीस ठाण्यात धीरेन भट्ट (रा़ गंगासदन अपार्टमेंट, धनतोली, नागपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार द्वारका येथील उन्नती व्हेईकल प्रायव्हेट लिमिटेड या महिंद्रा रेनॉल्ट कंपनीच्या कार विक्रीच्या शोरूममध्ये अकाउंटण्ट म्हणून असलेल्या संशयित जुनेद पटेल यांनी १४ जानेवारी २०१८ ते १० मे २०१८ या कालावधीत कारची विक्री झाल्यानंतर ग्राहकांनी अदा केलेल्या पैशांचा हिशेब दररोजच्या मॅन्युअल कॅशबुकमध्ये पूर्ण न नोंदविता अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये बँकेत भरल्याच्या खोट्या नोंदी केल्या़
तसेच कार विक्रीतून आलेले पैसे बँक खात्यात पूर्ण न भरता कॉम्प्युटरच्या एक्सल शीटमध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्समध्ये फेरफार करून उन्नती व्हेईकल प्रायव्हेट लिमिटेड व रेनॉल्ट शोरूम कंपनीची १ कोटी ४६ हजार १३ रुपयांची फसवणूक केली़ या प्रकरणी भट्ट यांच्या फिर्यादीवरून संशयित पटेलविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़