नाशिक : जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र गीते यांनी मंगळवारी पदभार स्विकारल्यानंतर बुधवारपासून ते पंधरा दिवसांच्या प्रदिर्घ रजेवर निघून गेले आहेत. वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिणा यांच्या कार्यकाळात मंदावलेल्या कामांना आता गती मिळेल असे वाटत असतांनाच गीते हे रजेवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प तोंडावर असतांना गीते रजेवर गेले आहेत. वादग्रस्त दिपककुमार मिणा यांची मुख्यमंत्र्यांनी अचानक उचलबांगडी केल्यानंतर त्यांच्या जागी मिरा-भार्इंदरचे आयुक्त नरेश गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती आदेशाच्या दुसऱ्याच दिवशी गीते यांनी नाशिकमध्ये येऊन मिणा यांच्याकडून पदभार स्विकारला होता. यावेळी त्यांनी सदस्य, सभापती यांच्या समन्वयातून यापुढील काळात कामकाज केले जाईल असे स्पष्ट करून विकासात्मक कामांवर भर देण्याचे सांगितले होते. मात्र पदभार घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवसांपासून ते पंधरा दिवसांच्या रजेवर निघून गेले आहेत. त्यांच्या रजेचे अद्याप कारण समजू शकले नाही.जिल्हा परिषदेचे संपुर्ण कामकाज ठप्प झालेले असतांना आणि जिल्हा परिषद सदस्यांकडून कामाचा तगादा सुरू असतांनाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मात्र सुटी घेतल्याने जिल्हा परिषदेला स्थिरस्थावर होण्याच आणखी विलंब होणार आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी अनेक कामे मार्गी लावणे अपेक्षित असतांना आणि आगामी अर्थसंकल्प तोंडावर असतांना जिल्हा परिषदेची अनेक कामे मार्गी लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागणार आहे.आपल्या कार्यपद्धतीने वादग्रस्त ठरलेले दिपककुमार मिणा यांच्या कार्यकाळातील प्रलंबित फाईल्सचा निपटारा करण्यासाठी अधिकाऱ्यांशी समन्वयातून कामकाज करून मार्ग काढला जाईल असे नियोजन आखणाऱ्या गीते यांनीच अचानक सुटी घेतल्याने अधिकारही संभ्रमात पडले आहेत. येत्या २२ तारखेपर्यंत गीते रजेवर असून पुढील महिन्यांपासूनच खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेच्या कामकाजला गती प्राप्त होऊ शकणार आहे.
नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी गीते रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 8:04 PM
जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र गीते यांनी मंगळवारी पदभार स्विकारल्यानंतर बुधवारपासून ते पंधरा दिवसांच्या प्रदिर्घ रजेवर निघून गेले आहेत.
ठळक मुद्दे गीते हे रजेवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुढील महिन्यांपासूनच येणार कामकाजला गती