नाशिक : जिल्हा परिषद शाळेतील विस्थापित झालेल्या शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अनेक शिक्षिकांची प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आॅनलाइन शिक्षक बदली प्रकरणात जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी खोटी माहिती भरून सोयीची बदली प्राप्त करून घेतली असून, अशा शिक्षकांची जिल्हा परिषदेत सध्या सुनावणी सुरू आहे. अशा खोटारड्या शिक्षकांची यादी विभागीय आयुक्तांनादेखील देण्यात आली होती. परंतु आयुक्तांनी यामध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याने विस्थापित शिक्षकांवर अन्यायच झाल्याचा आरोप करीत विस्थापित झालेल्या शिक्षकांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाच्या तिसºया दिवशी येवला येथील शिक्षिका अक्काताई कोडग, नांदगाव येथील रेखा देवरे, सुरगाणा येथील विजय भामरे, नांदगाव येथील योगीता देवरे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यासंदर्भात विस्थापित शिक्षकांच्या कृती समितीने अक्काताई कोडग यांची प्रकृती खालवण्यामागे मानसिक ताण असल्याचा आरोप केला आहे. कोडग यांची बदली शंभर किलोमीटर अंतरावर झाली असून, रोजचा प्रवास आणि यामुळे होणारी दगदग तसेच बदलीतील अन्यायामुळे होणारी मानसिक फरफट यामुळे त्या अस्वस्थ असल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे उपोषणार्थी विस्थापित कृती समितीने म्हटले आहे. विस्थापित शिक्षकाची पदस्थापना करण्यात यावी, अशी मागणी कृती समितीने केली आहे.