नाशिक : स्वर्गीय मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल लगत मनपा प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानाचा उपद्रव वाढल्याने सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने या मोकाट श्वानचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जॉगर्सने केली आहे.हिरावाडीत पाण्याच्या पाटाला लागून महापालिकेने तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर सकाळच्या सुमारास युवक, नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येत असतात. याच ट्रॅकवर पंधरा ते वीस मोकाट श्वान बसलेले असतात. सकाळी नागरिक ट्रॅकवर येत असले तरी या ठिकाणी विद्युत व्यवस्था नसल्याने नागरिकांना अंधारात मार्गक्रमण करावे लागते. ट्रॅकवर बसलेले कुत्रे फिरणाºया नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने या कुत्र्यांची नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दिवसभर ट्रॅकचा ताबा घेतलेले हे मोकाट श्वान ट्रॅकची माती उखडून खड्डे करत असल्याने या खड्ड्यात तोल जाऊन नागरिकांच्या पायाला दुखापत होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मोकाट कुत्र्यामुळे नागरिकांना सकाळी स्वसंरणार्थ फिरताना हातात दगड किंवा काठ्या घेऊन ये-जा करावी लागत असल्याचे चित्र दिसून येते. लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या अद्ययावत ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी ताबा घेतल्याने महापालिका प्रशासनातर्फे वेळीच श्वानचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ट्रॅकवर फिरण्यासाठी येणाºया नागरिकांनी केली आहे.