नाशिक : गेल्या शनिवारपासून तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली. या महापुरानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पावसानेही काहीशी विश्रांती घेतल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणांमधील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने पुराची तीव्रता कमी झाली आहे. दरम्यान, पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाची तीव्रता कमी होत असताना कळवण आणि सुरगाण्यात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे.जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिकसह अन्य तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणात ९४ टक्के पाणी साठा झाल्याने दीड लाख क्यूसेक इतके पाणी सोडण्यात आले होते. नांदूरमधमेश्वर धरणामधूनदेखील दीड लाख क्यूसेकच्या जवळपास पाणी सोडावे लागले होते त्यामुळे सायखेडा आणि चांदोरीला पुराचा चांगलाच फटका बसला. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्यात आली होती. सुमारे अडीचशे कुटुंबीयांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले, तर अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.शनिवार (दि.३) आणि रविवार (दि.४) या दोन दिवसांत नाशिक जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने धरणे आणि नद्यांची पातळीदेखील मोठ्या प्रमाणात वाढल्याने पूरपरिस्थितीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.
जिल्ह्यातील धरणांमधील विसर्ग घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 4:46 PM
नाशिक : गेल्या शनिवारपासून तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीने धोक्याची ...
ठळक मुद्देपूरपरिस्थिती कायम : पावसाची तीव्रताही कमी