नाशिक : सोसायटीचे वॉल कंपाऊंड तसेच दुरुस्तीची खोटे काम दाखवून त्याची बिले संस्थेस सादर करून सोसायटी संचालकाने सुमारे चार लाखांचा अपहार केल्याचा प्रकार देवळाली कॅम्पमध्ये उघडकीस आला आहे़ या प्रकरणी सोसायटीतील बारा संचालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात विवेक पांडुरंग पाटील (रा़ मालेगाव, जि़नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत देवळाली कॅम्पच्या लॅम रोड परिसरातील कहाननगर को आॅप हौसिंग सोसायटीच्या बारा संचालकांनी वॉल कंपाऊंड तसेच दुरुस्तीचे खोटे काम दाखवून व खोटी बिले संस्थेस दाखवून ३ लाख ४५ हजार ४० रुपयांचा खोटा हिशेब तयार करून ते सोसायटीच्या खर्चात दाखविले़ तसेच सभासदांना त्यांचे पैसे देय नसताना ५० हजार रुपये दिले़ अशा प्रकारे संचालकांनी संस्थेचे ३ लाख ९५ हजार ४० रुपयांचे नुकसान केले़
या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी संशयित प्रविणभाई पोपटलाल वोरा, अशोकभाई रतिलाल घिया, कांतीभाई रामजी मोटाणी, रजनीभाई ए़ कामदार, शरद गांधी, मधुभाई शहा, भरतभाई डी़शहा, जयवंतभाई मेहता, हिंमतभाई शहा, विजयचंद लुहाडीया, पंकजभाई मुकुंदभाई खारा, शशिकला एम़जैन (सर्व रा़ कहाननगर को आॅप हौसिंग सोसायटी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़