लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीत निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजनांची रक्कम बँक खात्यात जमा केल्याने बँकांमध्ये रक्कम काढण्यास गर्दी होत आहे. सदर गर्दी कमी करण्यासाठी बँकांनी आता ग्राहकांच्या वयोमानानुसार बँकांच्या व्यवहाराची वेळ ठरवून दिली आहे.कोरोनामुळे सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार सध्या महिला जनधन खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्याबरोबरच १ तारखेपासून पेन्शनदेखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पीएम किसान योजनेचा हप्तादेखील जमा होत आहे, त्यामुळे बँकेत पैसे काढणाऱ्याची गर्दी होताना दिसते. सोशल डिस्टन्स टाळण्यासाठी महाराष्ट्र बँकेसह अन्य राष्ट्रीयीकृत बँकांनीदेखील ग्राहकांच्या वयोमानानुसार सेवा देणे सुरू केले आहे. त्यात वृद्धांना प्राधान्य असून, तरुण वर्ग सर्वांत शेवटी ठेवण्यात आला आहे.सकाळी साडेदहा ते साडेअकरा या कालावधीत वय वर्ष ७० ते ८० यांच्यासाठी व्यवहार होतील. ११.४५ ते १२.३५ या वेळेत ६० ते ६९ वयोगट, दुपारी १.०५ ते २.०५ या वेळेत ५० ते ५९, तर २.०५ नंतर उर्वरित आर्थिक व्यवहार काळात १८ ते ४९ वयोगटातील खातेधारकांची कामे केली जाणार आहेत. विशेष म्हणजे यातही महिला खातेधारकांना प्राधान्य दिले जाणार आहे. अशा प्रकारचे व्यवहार करताना सोशल डिस्टन्स राखण्यात येत आहे. शक्यतो ग्राहकांना कूपन देण्यावर भर दिला जात आहे
ग्राहकांच्या वयोमानानुसार आता बँकांचे व्यवहारगर्दी टाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 4:25 PM