नाशिक: अंध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत महत्त्वाचे साधन ठरलेल्या ‘प्लेक्स टॉक’ या मशीन्सचे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील १६० विद्यार्थ्यांना विनामूल्य वाटप करण्यात आले. नॅब महाराष्ट आणि एनआायव्हीएच डेहरादून भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.डॉ. भालचंद्र जयंती आणि दृष्टिदान दिनाचे औचित्य साधून नॅब संकुल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी लुई ब्रेल, हेलन केलर आणि डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. महाराष्टतील विविध जिल्ह्यांमध्ये अंध विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या गतिमान शिक्षणासाठी संस्थेचे महासचिव गोपी मयूर व सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांच्या हस्ते १६० विद्यार्थ्यांना प्लेक्स टॉक मशीनचे वाटप करण्यात आले. एकूण वाटप केलेल्या शैक्षणिक सामग्रीची किंमत १० लाख रुपये इतकी आहे.यावेळी महासचिव गोपी मयूर म्हणाले, शिक्षणाशिवाय कुणीही जीवनात सक्षम होत नाही. अंध विद्यार्थ्यांनी स्वत:ला कमी न लेखता सर्वसामान्यांच्या बरोबरीने जिद्दीने अभ्यास करून सर्वसामान्यांप्रमाणेच सक्षम व्हावे, असे आवाहन केले. सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार म्हणाले, अंधांमध्ये प्रचंड गुणवत्ता असते. त्यांना फक्त मार्गदर्शनाची गरज असते. त्याची गरज नॅब महाराष्टÑाच्या वतीने पूर्ण केली जाते. शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी नॅब समन्वयाची भूमिका पार पाडत असल्याचेही ते म्हणाले. नाशिक, पुणे, बीड, औरंगाबाद, बुलडाणा, धुळे, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, लातूर, जालना, सोलापूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, यवतमाळ, नंदुरबार, हिंगोली या जिल्ह्यांमधील लाभार्थी याप्रसंगी उपस्थित होते.प्रास्ताविक संस्थेचे प्रशासकीय अधिकारी विनोद जाधव यांनी केले. आभार रत्नाकर गायकवाड यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने पठाण यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र तरंगे यांनी मशीनबाबत महत्त्व विशद केले. कार्यक्रमासाठी वर्षा देशमुख, बिलाल मणियार, संदीप बागुल, दत्तात्रय गुळवे, अशोक साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.