नाशिक : शनिवारी मध्यरात्रीपासून शहर जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने धरणांच्या पातळीत वाढ झाली असून, गोदावरी नदीलादेखील पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ५७० मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या पुढील तीन तासांमध्ये जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या तीन दिवसांपासून शहरात सर्वदूर पाऊस सुरू असून, नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. या पावसात ग्रामीण भागात काही ठिकाणी फरशी पुलांवरून पाणी गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे, तर काही भागातील रस्तेदेखील खचले आहेत. पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात १६० मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. गंगापूर, पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावल्याने धरणांमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे.जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सिन्नर तालुक्यात दमदार पाऊस सुरू असल्याने येथील नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत. त्र्यंबकेश्वरला १६० मि.मी. पावसाची नोंद झाली, तर पेठ येथे १०१ मि.मी. पाऊस नोंदला गेला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असताना इगतपुरीत मात्र अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला. अन्य दिवशी जोरदार पावसाची नोंद झालेल्या इगतपुरीत रविवारी मात्र ४६ मि.मी. इतकाच पाऊस झाला. सिन्नरला ५५, तर नाशिक तालुक्यात ९३ मि.मी. पावसाची नोंद झाली.
नाशिक जिल्ह्यात चोवीस तासांत ५७० मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 6:24 PM