नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्युदरामुळे गतवर्षी राज्यसरकार तसेच आरोग्य विभागाच्या कार्यशैलीबाबत माध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते़ यानंतर राज्यशासन व आरोग्य विभागाने सुधारणा केल्यामुळे नवजात बालकांच्या मृत्युदरात निम्म्याने घट झाल्याचा दावा राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मंगळवारी (दि़१४) दिली़ जिल्हा रुग्णालयास अचानक भेट देत नवजात बालकांच्या एसएनसीयु विभागाची पाहणी केल्यानंतर येथील कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले़ दरम्यान, आदिवासी भागातील बालमृत्यु रोखण्यासाठी कळवण आणि त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांमध्ये एसएनसीयु विभाग सुरू करण्यास मंजुरी दिल्याचेही सावंत यांनी सांगितले़
जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयु विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली ५५ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना गतवर्षी आॅगस्टमध्ये घडली होती़ या घटनेस माध्यमांनी वाचा फोडल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती़ याची दखल घेत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी रुगणालयास भेट विविध उपाययोजनांची अंमलबजवणी करण्याचे आदेश दिले होते़ तसेच जिल्हा रुग्णालयासाठी तातडीने सोयीसुविधाही पुरविण्यात आल्याने १५ टक्के नवजात बालकांचा मृत्युदर ८़३ टक्क्यांवर आला आहे़ राज्यातील एकमेव माता-नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग (एनआयसीयु) नाशिकमध्ये तयार होत असून यासाठी स्वतंत्र प्रशिक्षित डॉक्टरांसह, परिचारिका तसेच तज्ज्ञ न्युन्युटॉलॉजीस्टचा कर्मचारीवर्गही मंजूर करण्यात आली आहे़
नवजात अर्भकांवरील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय व मालेगाव याठिकाणी एसएनसीयु कक्ष असून या कक्षांप्रमाणेच त्र्यंबकेश्वर व कळवण या ठिकाणीही १२ बेडचा स्वतंत्र एसएनसीयु कक्ष येत्या सहा महिन्यात सुरू होणार आहे. कुपोषित माता व कुपोषित बालके यांच्यासाठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये मॅम-सॅम युनिट सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर यांचा समावेश आहे़ याबरोबरच माताबालक केंद्र तयार केले जाणार असून गर्भवती मातांसाठीचा अतिदक्षता विभाग स्वतंत्र असल्याचेही सावंत यांनी सांगितले़
यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ़सुरेश जगदाळे यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली़ यावेळी डॉ़पंकज गाजरे, डॉ़ कृष्णा पवार, डॉ़नरेंद्र बागूल, डॉ़सुप्रिया गोरे उपस्थित होते़
कुपोषणात ३० टक्क्यांनी घट