नाशिक : दहावीनंतर अकरावीला प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करताना होणारी धावपळ आणि लागणारा वेळ यांचा विचार करता जिल्हा प्रशासनाने शहरातील काही मोठ्या महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारी प्रमाणपत्रे देण्यासाठीची तात्पुरती व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सेतूवरील भार कमी होणार आहेच, शिवाय प्रमाणपत्रे तयार करण्यासाठीच्या कामकाजातदेखील सुसूत्रता येणार आहे.बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच दहावीचादेखील निकाल जाहीर होणार आहे. दहावीच्या निकालानंतर लागलीच आॅनलाइन पद्धतीने अकरावीच्या प्रवेशाला प्रारंभ होणार आहे. यासाठी शहरातील महाविद्यालयांची तयारीदेखील पूर्ण झालेली आहे. दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी लागणाºया कागदपत्रांसाठी लागणारा विलंब आणि होणारी धावपळ यामुळे विद्यार्थी आणि पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी अनेक दलालांकडून फसवणूक होण्याचीदेखील शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांना प्रमाणपत्रांसाठी धावाधावा करावी लागू नये यासाठी महाविद्यालयीन पातळीवरच काही ठिकाणी विशेष प्रमाणपत्रे शिबिरे घेतली जाणार आहेत.अकरावीच्या प्रवेशासाठी जातीचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला तसेच बोनाफाईड आदी दाखल्यांची गरज असते. जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत असलेल्या सेतू कार्यालयांमध्ये अशाप्रकारचे दाखले देण्याची व्यवस्था आहेच, परंतु दहावीच्या निकालांनतर अर्जासाठी होणारी गर्दी आणि धावपळ लक्षात घेऊन शहरातील काही महत्त्वाच्या महाविद्यालयांमध्ये दाखल्यांसाठी अर्ज स्वीकारणे आणि प्रमाणपत्रे वितरित करण्यासाठी तात्पुरती शिबिरे लावली जाणार आहेत. या केंद्रांसाठी नोडल आॅफिसर म्हणून संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची नियुक्ती केली जाणार आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात लवकरच बैठक बोलाविण्यात येणार आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये दाखल्यांची शिबिरे सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे अशा शिबिरांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीदेखील संबंधित महाविद्यालयांवर सोपविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांना दाखल्यांसाठी योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी स्वतंत्र व्यवस्थादेखील केली जाणार आहे. या संपूर्ण यंत्रणेवर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियंत्रण राहणार आहे.
प्रवेशासाठीची कागदपत्रे मिळणार महाविद्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 3:35 PM
नाशिक : दहावीनंतर अकरावीला प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करताना होणारी धावपळ आणि लागणारा वेळ यांचा विचार करता जिल्हा ...
ठळक मुद्देप्रशासनाचा निर्णय : महाविद्यालयांच्या प्राचार्यांची लवकरच बैठक