नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील ८४ टक्के बालकांना रविवारी (दि़ ११) पोलिओचे डोस पाजण्यात आले़ नाशिक महापालिका क्षेत्रात १ लाख ४६ हजार ३८३, मालेगाव महापालिका क्षेत्रात ५२ हजार ३८७, ग्रामीण भागात ३ लाख ९३ हजार ५२१ तर नगरपालिका क्षेत्रात ५१ हजार ८७८ असे एकूण ६ लाख ४४ हजार १६९ बालकांना पोलिओचे लसीकरण करण्यात आले़
महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते बालकाला पोलिओ डोस पाजून शुभारंभ करण्यात आला़ यावेळी प्रभाग सभापती श्रीमती शाहीन मिर्झा, नगरसेविका अर्चना थोरात, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या हस्ते पांढुर्ली येथे लहान बालकास पोलिओचा डोस पाजून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या मोहिमेचा शुभारंभ केला़ यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुशील वाक्चौरे उपस्थित होते़ तर जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे, जागतिक आरोग्य संघटनेचे राज्यस्तरीय सर्वेक्षर वैद्यकीय अधिकारी डॉ़ कमलाकर लष्करे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला़ जिल्ह्यातील शून्य ते ५ वर्षे वयोगटातील अपेक्षित ७ लाख ७४ हजार ५५३ बालकांना पोलिओ लस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
नाशिक महापालिका क्षेत्रातील १ लाख ८६ हजार ८४५ पैकी १ लाख ४६ हजार ३८३ बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. नाशिक ग्रामीणमधील ४ लाख १४ हजार ९६ बालकांपैकी ३ लाख ९३ हजार ५२१ बालकांना, नगरपालिका क्षेत्रातील ५१ हजार ३४९ पैकी ५१ हजार ८७८ बालकांना तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील १ लाख १९ हजार ३१९ बालकांपैकी ५२ हजार ३८७ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़ पोलिओ लसीकरणासाठी जिल्ह्यात ४ हजार ४२९ बूथ उभारण्यात आले होते. सोमवारपासून तीन ते पाच दिवस ३ हजार ५२२ पथकांद्वारे उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन पोलिओचे डोस पाजले जाणार आहेत़
नगरपालिका क्षेत्रातील पोलिओ लसीकरणत्र्यंबकेश्वर - १८०४, इगतपुरी - ३२१६, भगूर - ११५६, देवळाली - ३८४४, सिन्नर - १०६१६, येवला - ७११९, नांदगाव - ४१४३, मनमाड - १११०१, सटाणा - ८८७९.
नाशिक महापालिका क्षेत्रातील पोलिओ लसीकरण
जिल्ह्यातील पोलिओ डोसची टक्केवारीबागलाण ९५, चांदवड ९४, देवळा १००, दिंडोरी ९६, इगतपुरी ९७, कळवण ९९, मालेगाव ९२, नाशिक ९८, नांदगाव ९३, निफाड ९३, पेठ ९०, सिन्नर ९६, सुरगाणा ८७, त्र्यंबकेश्वर ९४, येवला ९३, जिल्हा परिषदअंतर्गत : ९४, नगरपालिका क्षेत्र : १००़६३