नाशिक : वडिलोपार्जित घर व मिळकतीतील महिलेचे नाव वगळून खोट्या दस्तऐवजांद्वारे स्वत:चे वारसदार म्हणून नोंद केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील दोघांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
इरशादबी नूरमोहम्मद शेख (५८, रा गोदरेजवाडी, नाशिकरोड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार संशयित शेख इक्बाल शेख मुनीर व शेख रईस शेख इक्बाल (रा़ गुरुदत्त कॉलनी, शिवराई रोड, ता़ वैजापूर, जि़ औरंगाबाद) यांनी सिटी सर्व्हे क्रमांक ६६०० व ६६९५ वरील वडिलोपार्जित घर मिळकतीतील इरशादबी यांचे नाव डावलून खोटे दस्तऐवज तयार करून ते खरे आहेत, असे भासवून त्याचा वापर करीत देवळातील नगर भूमापन अधिकारी क्रमांक १ येथे नाव लावून घेत फसवणूक केली़
इरशादबी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही दखल घेतली न गेल्याने त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता़ न्यायालयाने या दाव्यात नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले होते़ त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़