नाशिक : कायदेशीर हक्क नसताना बेकायदेशीरपणे औरंगाबाद वक्फ मंडळाकडे मिळकतीत हक्क असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून समझोत्यापोटी एक कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या नऊ संशयितांविरोधात भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
जकी अहमद गुलाम हुसेन खतीब (४९,रा़ जियाउद्दीन मिल कंपाऊंड, चौक मंडई) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची व त्यांच्या नातेवाईकांच्या मालकीची सिटी सर्व्हे नंबर ३८२३ अ मध्ये प्रत्यक्षात कब्जात असलेली ६ हजार ४०० चौरस मीटर क्षेत्र आहे़ यापैकी ३००० चौरस मीटर क्षेत्रावर संशयित सय्यद लियाकत निसार, सय्यद फिरोज सादीक, सय्यद इरफान बाबू, सय्यद बाबू अब्बास, शेख मोबीन युसूफ, सय्यद मुदस्सर सलीम, मिर्झा एजाज जावेद बेग, शेख शादाब अकबर, सय्यद अझहर नझीर (रा़ चौक मंडई, भद्रकाली) यांनी कोणताही कायदेशीर हक्क नसताना बेकायदेशीररित्या सय्यद हबीब शहा फकिर वक्फ अलल औलाद, नाशिक या वक्फ संस्थेची नोंदणी करण्याकरीता खोटे वक्फ डीड प्रतिज्ञा पत्रासह महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद येथे सादर केले़
तसेच सदर वक्फ संस्थेची नोंदणी झालेली नसताना नगर भूमापन अधिकारी क्रमांक एक सीटी सर्व्हे यांच्याकडे या मिळकतीवर वक्फ संस्थेची नोंदणी करण्याकरीता खोटा अर्ज दाखल केला़ संशयितांनी जकी खतीब व त्यांच्या नातेवाईकांचे मिळकतीच्या कब्जाचे नुकसान व्हावे वा फिर्यादींनी मिळकतीवर कब्जा सोडून द्यावा अन्यथा समझोत्याकरीता एक कोटी रुपये द्यावेत यासाठी धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नऊ संशयितांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़