नाशिक: शासकीय रूग्णालयातील रूग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होऊन त्याला जीवदान मिळावे यासाठी महावितरण व्यवस्थापकीय संचालकांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात आलेल्या मोहिमेत सुमारे ५ हजार अधिकारी,कर्मचाऱ्यांनी महारक्तदान केले. नाशिक परिंमंडळात देखील सुमारे ५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी रक्तदानासंदर्भात सर्व कर्मचाºयांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन महावितरणच्या सुमारे ५ हजार ८२६ कर्मचाºयांनी शुक्र वारी (दि. ११) एकाच दिवशी राज्यभरातील विविध कार्यालयांत आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये सहभाग घेत रक्तदानाचे महादान केले. यामध्ये नाशिक परिमंडळात आज विविध १५ ठिकाणी सरकारी व खासगी रक्तपेढीच्या साहाय्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नाशिक परिमंडळ अधिनस्त असलेल्या नाशिक शहर मंडळ १६१ , मालेगाव मंडळ १०० आणि अहमदनगर मंडळ मध्ये २३९ असे नाशिक परिमंडळात एकूण ५०० अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान केले. एखाद्या शासकीय कार्यालयाने संपूर्ण राज्यात एकाच वेळी रक्तदान शिबीर घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा महावितरणने केला आहे.
नाशिक परिमंडळ कार्यालय विद्युत भवनाच्या आवारात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्धघाटन मुख्य अभियंता ब्रिजपालिसंह जनवीर यांच्या हस्ते झाले. यावेळी अधिक्षक अभियंते प्रविण दरोली, संजय खंडारे, सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, विधी अधिकारी प्रशांत लहाने, प्रणाली विश्लेषक राजेंद्र सोनवणे तसेच जनकल्याण रक्तपेढी, नाशिकचे डॉ. राठी उपस्थित होते. प्रास्ताविक उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांनी केले. संचालन व्यवस्थापक मंगेश गाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी मानले.