नाशिक : अल्पवयीन मुलांचा वापर करून घरफोड्या करणा-या पंचवटीतील रिक्षाचालकास गंगापूर पोलिसांनी अटक केली असून, या तिघांकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़
गंगापूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक के़डी़पाटील यांना रिक्षातून परिसराची रेकी करून घरफोडी करणाºया संशयितांची माहिती मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर वाघ, पोलीस उपनिरीक्षक कोल्हे, पोलीस हवालदार देसले, ढगे, सुपले यांनी रेकी करणाºया रिक्षाचा (एमएच १५, झेड ८१६९) चा क्रमांक मिळवून पाळत ठेवली़ यानंतर रिक्षाचालक संशयित दुर्गेश दिलीप गवळी (२७, रा़ काकड चाळ, मखमलाबाद नाका, पंचवटी) यास ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली़
संशयित गवळीसह दोन विधीसंघर्षित संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक एचपी कंपनीचा लॅपटॉप, पाच एचपी कंपनीचे कॉम्प्युटर, प्रिंटर, पाच युपीएस, स्कॅनर, दोन होम थिएटर, चार मोबाइल, एक स्प्लेंडर दुचाकी, अॅटो रिक्षा, १३ स्पोर्ट सायकल असा तीन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़