नाशिक : उसनवार घेतलेले पैसे परत केले नाही या कारणावरून नाशिकमधील हार्डवेअर व्यवसायिकास पुण्यातील सहा संशयितांनी स्कॉपिओतून अपहरण व मारहाण करून पाच लाख रुपयांची खंडणी मागीतल्याची घटना गुरुवारी (दि़१७) सायंकाळी पाथर्डी फाटा परिसरात घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
इंदिरानगर पोलीस ठाण्यात ललीतकुमार चौधरी (३०, रा़ साईराम रो हाऊस, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पाथर्डी फाटा येथे जनलक्ष्मी हार्डवेअर नावाचे दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी ते भावासमवेत दुकानात असताना पुणे येथील संशयित समीर कच्ची, ईश्वर गाढवे, सोहेब कच्ची, समीर शमनानी, गणेश बोरडे आणि विशाल गावडे हे स्कॉर्पिओ वाहनातून दुकानात आले़ यानंतर आमचे उसनवार घेतलेले पैसे परत का केले नाही असे म्हणत शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली़
यानंतर संशयितांनी चौधरी यांना बळजबरीने स्कॉर्पिओत डांबून अपहरण केले़ यानंतर पाच लाख रुपयांची खंडणी मागून दोन कोरे धनादेश दे, अन्यथा जीवे ठार मारू अशी धमकी दिली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़