नाशिक: वडाळागावातील दिवसागणिक वाढणारे भंगार गुदाम ‘जैसे थे’च असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा धोका गंभीर बनत चालला आहे. भंगार गुदामाबरोबरच प्लॅस्टिकचे ठोकळे बनवण्याचे अनधिकृत कारखानेसुद्धा दिवसागणिक वाढत चालले आहेत. अनधिकृत कारखाने अद्याप सुरू असल्याने महापालिका प्रशासनाच्या बघ्याच्या भूमिकेमुळे संशय व्यक्त केला आहे.सुमारे दहा हजार लोकवस्ती असलेल्या या गावात शेतकरी व हातावर काम करणाऱ्यांची लोकवस्ती म्हणून ओळखले जाते. सुमारे वीस वर्षांपूर्वी बोटावर मोजण्याइतकी चार ते पाच भरवस्तीत भंगार गुदामे होती. आज त्यांची संख्या सुमारे ४० ते ५० झाली आहे. मेहबूबनगर, मदिनानगर, सादिकनगर व अण्णा भाऊ साठेनगर, गुलशननगर आदी परिसरात ही गुदामे आहेत. या गुदामामध्ये शहरात विविध भागातून गोळा केलेले भंगार जमा केले जाते. त्यामुळे दिवसभर ट्रकमधून भंगाराची ने-आण करताना सदर वाहन बेफाम वेगाने मार्गक्रमण करत असल्याने अपघात होऊन जीवितहानीची घटनाही घडली आहे. गुदामाच्या नावाखाली शहरातून विविध परिसरातून गोळा केलेले प्लॅस्टिक पिशव्या जमा करण्यात येतात. त्यानंतर प्लॅस्टिक पिशव्या वितळविण्यात येऊन त्याचे प्लॅस्टिकचे ठोकळे तयार करण्यात येतात व नको असलेला भंगार माल व्यावसायिक याच ठिकाणी जाळतात. त्यामुळे सायंकाळनंतर ते पहाटेपर्यंत परिसरात दुगंर्धीयुक्त धुराचे साम्राज्य निर्माण होत आहे.
वडाळागाव भंगार गुदामामुळे आरोग्यास धोका घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 6:09 PM