नाशिक : चलनातील बनावट नोटा असल्याचे माहिती असूनही त्याजवळ बाळगून त्यांचा आयसीआयसीआय बँकेत भरणा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस आयुक्तालयात बनावट चलनाचा दाखल होणारा २०१७ मधील हा सातवा गुन्हा आहे़आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी विनय चंद्रात्रे (हिरावाडी रोड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २ जानेवारी २०१७ ते २६ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत बँकेच्या कालिकामंदिर व बोधलेनगर शाखेत संशयिताने ४१ बनावट नोटांचा बँकेत भरणा केला़ या बनावट नोटांमध्ये १००, ५०० व १००० रुपये दराच्या नोटा असून त्यांचे मूल्य २९ हजार ७०० रुपये इतके आहे़ पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत ६ लाख ४ हजार ८०० रुपयांचे बनावट चलन बँकामध्ये भरण्यात आल्याचे समोर आले आहे़दरम्यान, या नोटा बनावट व नकली असल्याचे माहिती असूनही संशयिताने त्या कब्जात बाळगल्या व त्यांचा बँकेत भरणा करून त्या चलनात आणल्या़ या प्रकरणी चंद्रात्रे यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अकरा महिन्यांच्या कालावधीत सात गुन्हे दाखलनोटाबंदीनंतर शहर पोलीस आयुक्तालयात बनावट चलनाचे सहा गुन्हे दाखल आहेत़ जानेवारी २०१७ ते आॅक्टोबर २०१७ या दहा महिन्यांच्या कालावधीत सरकारवाडा, मुंबई नाका, अंबड, आडगाव व भद्रकाली या पाच पोलीस ठाण्यांमध्ये बनावट चलनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ राष्ट्रीय तसेच खासगी बँकेच्या व्यवस्थापकांनी दाखल केलेल्या या गुन्ह्यांमध्ये पाच लाख ७५ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा बँकांमध्ये करण्यात आला आहे़