नाशिकरोड: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आपापल्या राज्यात घरी गेलेले मजूर, कामगार, कारागीर हे पुन्हा महाराष्ट्रात परतू लागल्याने मुंबईला येणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढली आहे. तर मुंबईहून परराज्यात जाणाऱ्या रेल्वेला प्रवाशांची अत्यल्प गर्दी आहे. सध्या नाशिकरोड रेल्वेस्थानक मार्गे अप व डाऊनच्या एकूण साठ रेल्वे धावत आहे त्यामध्ये बहुतांश रेल्वे या लांब पल्ल्याच्या आहे. राज्य अंतर्गत रेल्वे अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. पंचवटी, राज्यधानी, गोदावरी, देवळाली भुसावळ, मुंबई भुसावळ, शटल अशा राज्यांतर्गत दररोज जाणाऱ्या रेल्वे अद्याप बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लाँकडाऊन मुळे सर्व बंद असल्याने परराज्यातील बहुतांश कामगार, मजूर, कारागीर हे आपापल्या गावी निघून गेले होते. मात्र राज्यात लाँकडाऊन व निर्बंध शिथील करण्यात आल्याने परराज्यात आपापल्या घरी गेलेले कामगार, मजूर, कारागीर हे पुन्हा महाराष्ट्रात मुंबईकडे परतु लागल्याने उत्तरप्रदेश, बिहार येथून मुंबईला येणाऱ्या रेल्वेला प्रवाशांची गर्दी वाढली आहे. मात्र मुंबईहून परराज्यात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अत्यल्प गर्दी आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानक मार्गे दररोज दहा ते पंधरा हजार प्रवासी ये-जा करीत आहे.रेल्वेने परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षण तिकीट सक्तीचे आहे. आरक्षण तिकीट घेण्यासाठी संबंधित प्रवाशांना आरटीपीसीआर रिपोर्ट सोबत ठेवणे बंधनकारक आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या सामानाला सॅनिटायझर केले जात आहे.