एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील ऊस, द्राक्षे मळे भागात बिबट्यांचे वास्तव्य दिवसेंदिवस वाढत असून, या भागातील गावे सध्या दहशतीखाली आहेत. या भागात बिबट्याच्या पाच जोड्या असण्याची दाट शक्यता शेतकरी वर्तवित आहे. दिवसाढवळ्याही अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक धास्तावले आहेत. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जाखोरी शिवारात बिबट्या रविवारी (दि. २६) पहाटे अडकला. त्यामुळे रहिवाशांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडला.गेल्याच आठवड्यात हिंगणवेढे गंगापाडळी शिवारात ११ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच परवा जाखोरी व कोटमगाव शिवारात बिबट्याने नागरिकांना दर्शन दिल्याने नागरिक दिवसाही शेतात जायला घाबरू लागले आहेत.दोन-तीन दिवसांपूर्वी जाखोरी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून काहींचे पशुधन व श्वानांवर हल्ला केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्याने विलास मधुकर जगळे, आप्पा पांडुरंग कळमकर यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाच्या अधिकाºयांनी बिबट्याचा वावर असलेल्या भागाची पाहणी करून, जाखोरीनजीक दारणा नदीच्या कडेला शेतकरी नवाब शेख यांच्या गट नंबर ५०४ या शेतात पिंजरा लावला होता. या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाला. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक भाऊसाहेब पंढरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जेरबंद बिबट्याचा पिंजरा हलविण्यासाठी नाशिक पश्चिम वनविभागाची 'वन्यप्राणी रेस्क्यू व्हॅन'ला पाचारण केले. वाहनचालक प्रवीण राठोड यांनी काहीवेळेतच घटनास्थळ गाठले, तत्काळ पिंजरा व्हॅनमधून वनविभागाच्या रोपवाटिकेत हलविला. पूर्ण वाढ झालेला नार बिबट्या असल्याचे वनविभागाने सांगितले.जाखोरी पाठोपाठ कोटमगाव शिवारातही बिबट्याने धुमाकूळ घातल्याने सरपंच बाळासाहेब म्हस्के यांनी वनविभागाला कळविले. बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणाची पाहणी वन कर्मचाºयांनी केली असता शेतकरी संपत घुगे, जगदीश गोसावी यांच्या उसाच्या शेतालगत बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आले. या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी शेतकºयांनी केली. यावेळी बिबट्याबाबत खबरदारी घेण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत वन विभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांचे प्रबोधन केले.
तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांचे वाढते वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 5:04 PM