नाशिक : शहरातील एका फर्ममध्ये गुंतवणूक करण्यास सांगून दांपत्य व त्यांचा साथीदार अशा तिघांनी औरंगाबाद येथील इसमाकडून साडेतेरा लाख रुपये घेऊन त्यातील साडेसात लाख रुपये परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित महेश भारंबे, चारुलता भारंबे व अतुल कासार या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद-पैठण रोडवरील ईटखेडा गावाजवळील साई वृंदावन सोसायटीत फिर्यादी सुनील गोविंद कुमावत (वय ४५) राहतात. त्यांचा परिचय काही दिवसांपूर्वी संशयित महेश सुधाकर भारंबे व चारुलता महेश भारंबे (रा़ स्वामी समर्थनगर, जत्रा हॉटेलच्या मागे, आडगाव शिवार) व अतुल सुपडू कासार (पंचवटी) यांच्याशी झाला़ या तिघा संशयितांनी कुमावत यांना ऐश्वर्या ट्रेडर्स नावाच्या फर्ममध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले.
२० ते २७ फेब्रुवारी या कालावधीत संशयितांनी कुमावत यांना जत्रा हॉटेलच्या मागे असलेल्या स्वामी समर्थनगरमधील स्वप्नपूर्ती-२, उमा रेसिडेन्सी येथे बोलावून विश्वास संपादन केला व १३ लाख ७५ हजार रुपये घेतले; मात्र त्यांना या गुंतविलेल्या रकमेचा कोणताही मोबदला दिला नाही. त्यामुळे सुनील कुमावत यांनी गुंतविलेले पैसे परत करण्याची मागणी केली असता केवळ ४ लाख ७५ हजार रुपये परत करण्यात आले़, तर उर्वरित नऊ लाख रुपये देण्यासाठी संशयितांनी दि. १६ मे २०१६ ते दि. २६ एप्रिल २०१७ पावेतो करारनामा करून दिला. त्याप्रमाणे त्यांनी उर्वरित रकमेतून दीड लाख रुपये कुमावत यांना परत केले; मात्र साडेसात लाख रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली.
या फसवणुकीबाबत सुनील कुमावत यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत संशयितांविरोधात फिर्याद दिली़