नाशिक : कोणाच्या निषेधासाठी नव्हे तर पुस्तकांसारख्या सर्वोत्तम मित्राच्या प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या अनोख्या ‘बुक मार्च’ने रविवारी सकाळी नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या अकराव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने या अनोख्या ‘मूक मार्च’चे आयोजन करण्यात आले होते.नाशिकमध्ये रविवारी सकाळी ‘पुस्तकप्रेमी’ नागरिकांनी अनोखा बुक मार्च काढत त्यांचे पुस्तक आणि ग्रंथप्रेम दाखवून दिले. आज सकाळी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या टिळकवाडी येथील निवासस्थानापासून बुक मार्चला प्रारंभ झाला. गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकापर्यंत बुक मार्च काढण्यात आला.नाशिकमधील पुस्तक प्रेमी विनायक रानडे हे वाचन चळवळ वाढविण्यासाठी ग्रंथ आपल्या दारी हा उपक्र म गेल्या दहा वर्षांपासून राबवित आहेत. देश-विदेशांत पोहोचलेल्या या अनोख्या उपक्र माची दशकपूर्ती विविध उपक्र मांनी साजरी करण्यात आली. प्रत्येक नागरिक आपल्या आवडीच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे छायाचित्रांचे फलक हाती घेऊन बुक मार्चमध्ये सहभागी झाले होते.
अनोख्या ‘बुक मार्च’ने नाशिककरांचे वेधले लक्ष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 1:08 AM