नाशिक : उत्तरेकडील शीतलहरींचा नाशिक शहरासह जिल्ह्यात शिरकाव झाला असून किमान तापमानाचा पारा मागील चार दिवसांपासून वेगाने घसरत आहे. या हंगामात प्रथमच मंगळवारी (दि. २१) पारा १०.८ अंशापर्यंत खाली आल्याची नोंद झाली. वाढत्या थंडीच्या कडाक्याने नाशिककर गारठले आहेत.
मागील महिन्यांत हवामान बदलामुळे अचानकपणे झालेल्या अवकाळी पावसाने किमान तापमानाचा पारा १२.७ अंशापर्यंत खाली आणला होता. त्यानंतर पुन्हा थंडी शहरातून गायब झाली. मात्र राज्यात सर्वत्र शीतलहरींचा प्रभाव गेल्या चार दिवसांपासून पाहावयास मिळू लागला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांपर्यंत किमान तापमानाचा पारा दोन अंशांनी घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दोन दिवसांमध्ये दोन अंशांनी शहराचे तापमान कमी झाले आहे. किमान व कमाल तापमानात घट होऊ लागल्याने थंडीची तीव्रताही वाढू लागली आहे. यामुळे नाशिककरांना दिवसभर ऊबदार कपड्यांचा वापर करणे भाग पडले आहे. नोकरदार वर्ग सोमवारी सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत स्वेटर, जॅकेट परिधान करून वावरताना आढळून आला.
उत्तरेकडून दक्षिणेकडे शीतलहरींचा प्रवास सुरू झाल्याने थंडीचा जोर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वाढला आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ आणि कोकण भाग थंडीने गारठून गेला आहे. सोमवारी शहरासह ग्रामीण भागात थंडीपासून बचाव करण्यासाठी गोदाकाठासह अंबड, सातपूर, गंगापूर, जुने नाशिक, पंचवटी, वडाळागाव, पाथर्डी, मखमलाबाद भागात शेकोट्या पेटविलेल्या पाहावयास मिळाल्या. मंगळवारी पुन्हा किमान तापमानात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थंडीच्या लाटेची तीव्रता दोन दिवसांनंतर कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
--इन्फो--
आठवड्यातील किमान तापमान असे.... (अंश सेल्सिअसमध्ये)
रविवार (दि. १२) - १४.८
सोमवार (दि. १३)- १५.८
मंगळवार (दि. १४)- १४.५
बुधवारी (दि. १५)- १५.८
गुरुवारी (दि. १६) - १४.५
शुक्रवारी (दि. १७) - १३.८
शनिवारी (दि. १८) - १३.६
रविवारी (दि. १९) - १२.५
सोमवारी (दि.२०)- ११.४