नाशिक : शहर व परिसरात रविवारी संध्याकाळपासून अचानकपणे थंड वारे वेगाने वाहू लागल्याने वातावरणात गारठा वाढल्याचा अनुभव नाशिककरांना येत होता. सोमवारी (दि.२१) पहाटे थंडीचा कडाका जाणवला. सकाळी साडेआठ वाजता ९.१ अंश इतके तापमान नोंदविले गेले. हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वात नीचांकी तापमान आहे.हवामान अन् हलक्या सरींचा वर्षाव अशा विचित्र वातावरणाचा नाशिककर आठवडाभरापूर्वी अनुभव घेत होते. मागील चार दिवसांपासून आकाश निरभ्र झाले असून लख्ख सूर्यप्रकाश पडत आहे. रविवारी कमाल तापमान २७.४ अंश तर किमान तापमान १२.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. एका दिवसात किमान तापमानाचा पारा थेट पाच अंशांनी खाली घसरला.शहराचे वातावरण थंड होऊ लागले असून किमान तापमानाचा पारा या आठवड्यात वेगाने घसरण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तविली जात आहे. उत्तरेकडील शीतलहरी राज्याच्या वेशीवर आल्याने शहराच्या वातावरणात अचानकपणे गारठा वाढू शकतो, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. ढगाळस्थिती दूर झाल्यामुळे सध्या कोरडे वातावरण अनुभवयास येत आहे. अरबी समुद्रात मागील आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणातून थंडी गायब झाली होती. राज्यातील विविध शहरांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विदर्भाला पुन्हा हुडहुडी भरु लागली असून सोमवारी गोंदिया येथे राज्यातील सर्वाधिक नीचांकी ७अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदविले गेले. त्याखालोखाल नागपूर, वर्धामध्ये पारा घसरला आहे. एकूणच विदर्भ गारठत असताना रविवारी संध्याकाळपासून उत्तर महाराष्ट्रातही थंड वाऱ्यांचा वेग वाढल्याचे दिसून आले.तीन अंशांनी घसरण होण्याची शक्यताहवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत पुन्हा तीन अंशांनी किमान तापमानात घसरण होऊ शकते. त्यानंतर पुन्हा राज्याचा किमान तापमानाचा पारा काही दिवसांसाठी चढता असेल. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीय वारे सक्रिय असल्याची स्थिती आहे, त्याचा परिणाम काही दिवसांत दिसून येऊ शकेल.
नाशिककर गारठले : किमान तापमानाचा पारा ९.१अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 6:22 PM
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत पुन्हा तीन अंशांनी किमान तापमानात घसरण होऊ शकते. त्यानंतर पुन्हा राज्याचा किमान तापमानाचा पारा काही दिवसांसाठी चढता असेल.
ठळक मुद्देकडाका वाढलाशहरात थंडी पुन्हा परतली